20
मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, इस्राएल लोकांना सांग “मोशे मार्फत मी माझी आज्ञा तुमच्यापर्यंत पोचवली. मोशेने तुम्हाला सुरक्षिततेसाठी खास नगरे उभारायला सांगितले. एखाद्याच्या हातून चुकून मनुष्यवध झाला, व त्याचा खुनाचा उद्देश नसेल तर तो माणूस या नगरात आश्रयाला जाऊ शकतो.
“त्याने असे करावे. पळून जाऊन अशा नगराशी पोचल्यावर वेशीपाशी थांबावे. तेथे गावातील वडीलधाऱ्यांना झालेली हकीकत सांगावी. मग त्यांनी त्याला आत येऊ द्यावे. त्याला आपल्यात राहण्यासाठी जागा द्यावी पण त्याचा पाठलाग करत येणारा माणूसही तेथे येऊन पोचेल तर तेव्हा या वडीलधाऱ्यांनी त्याला थोपवून धरावे. आश्रयासाठी आलेल्या व्यक्तीला त्यांच्या ताब्यात देऊ नये. त्यांनी त्याला संरक्षण द्यावे. कारण ज्याला मृत्यू आला त्याला या व्यक्तीने जाणून बुजून मारलेले नाही. ती चुकून योगायोगाने घडलेली गोष्ट होती. रागाच्या भरात. मारायचे ठरवून त्याने काही केले नाही. त्यावेळी ते चुकून झाले, इतकेच. न्यायनिवाडा होईपर्यंत त्याने त्या नगरात राहावे. किंवा तेथील मुख्य याजक हयात असेपर्यंत राहावे. नंतर जेथून आला त्या आपल्या स्वतःच्या नगरात, आपल्या घरी त्याने परत जावे.”
तेव्हा “आश्रयस्थाने” म्हणून इस्राएल लोकांनी काही नगरांची निवड केली. ती नगरे अशी; नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील, गालील मधले केदेश, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा (म्हणजेच हेब्रोन) यार्देनच्या पूर्वेला रऊबेनींच्या प्रदेशापैकी वाळवंटातील यरीहो जवळचे बेसेर, गाद वंशाच्या विभागापैकी गिलादमधील रामोथ. मनश्शेच्या वंशातील बाशानमधील गोलान.
इस्राएल लोक किंवा त्यांच्यात राहणारे परकीय यांच्यापैकी कोणाच्याही हातून चुकून मनुष्यवध झाल्यास त्याने पळून जाऊन आश्रय घ्यावा म्हणून ही नगरे नेमली. म्हणजे त्या व्यक्तीला संरक्षण मिळेल व तिचा पाठलाग करणाऱ्याच्या हातून ती व्यक्ती मारली जाणार नाही. मग त्या नगरातील न्यायसभेने निवाडा करावा.