स्तोत्रसंहिता 24
दावीदाचे स्तोत्र.
पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे.
जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत.
परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली.
ती त्याने नद्यांवर निर्माण केली.
 
परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल?
परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?
तिथे कोण उपासना करु शकतो?
ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्दय शुध्द आहे,
ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही
आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
 
चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात.
ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात.
ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात.
ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात.
 
वेशींनो, आपले मस्तक उंच करा.
जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे
तो गौरवशाली राजा आत येईल.
तो गौरशाली राजा कोण आहे?
परमेश्वरच तो राजा आहे.
तोच बलवान सैनिक आहे परमेश्वरच तो राजा आहे, तोच युध्दातला नायक आहे.
 
वेशींनो, तुमची मस्तके उंच करा.
प्राचीन दरवाजांनो, उघडा म्हणजे
तो गौरवशाली राजा आत येईल.
10 तो गौरवशाली राजा कोण आहे?
सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.