स्तोत्रसंहिता 73
आसाफाचे स्तोत्र
1 देव इस्राएल बरोबर खरोखरच चांगला वागला.
शुध्द ह्दय असलेल्या लोकांशी देव चांगला वागतो.
2 मी जवळ जवळ घसरलो
आणि पाप करायला लागलो.
3 दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले
आणि मी त्या गार्विष्ट लोकांचा मत्सर करायला लागलो.
4 ते लोक आरोग्य संपन्न आहेत.
त्यांना जीवन जगण्यासाठी लढा द्यावा लागत नाही.\f + \fr 73:4 \fk त्यांना … लागत नाही शब्दश:“त्यांना मरताना काही पाश नसतात.”\f*
5 त्या गर्विष्ट लोकांना आपल्यासारखे दु:खभोगावे लागत नाही.
दुसऱ्या लोकांवर येतात तशी संकटे त्यांच्यावर येत नाहीत.
6 म्हणून ते आतिशय गर्विष्ठ आणि तिरस्करणीय लोक आहेत.
ते ज्या प्रकारची आभूषणे आणि भपकेदार कपडे घालतात त्या वरुन हे कळून येते.
7 जर त्या लोकांना एखादी गोष्ट आवडली तर ते सरळ जातात आणि ती घेऊन येतात.
त्यांना जे काही करायची इच्छा होते ते ते करतात.
8 ते दुसऱ्यांविषयी दुष्ट आणि वाईट गोष्टी बोलतात ते गर्विष्ठ आणि दुराग्रही आहेत.
आणि दुसऱ्या लोकांचा कसा फायदा उठवायचा याचा ते सतत विचार करीत असतात व त्याप्रमाणे योजना आखतात.
9 आपण म्हणजेच देव असे त्या गर्विष्ठ लोकांना वाटते
आपण पृथ्वीचे राज्यकर्ते आहोत असे त्या लोकांना वाटते.
10 म्हणून देवाची माणसे सुध्दा त्यांच्याकडे वळतात
आणि त्यांनी सांगितलेली कामे करतात.
11 ते दुष्ट लोक म्हणतात, “आम्ही काय करतो ते देवाला माहीत नाही,
सर्वशक्तिमान देवाला ते माहीत नाही.”
12 ते गर्विष्ठ लोक दुष्ट आहेत, पण ते श्रीमंत आहेत
आणि अधिक श्रीमंत होत आहेत.
13 मग मी माझेच मन शुध्द का करु?
मी माझे हात स्वच्छ का करु.
14 देवा, मी दिवसभर त्रास भोगतो
आणि तू मला रोज सकाळी शिक्षा देतोस.
15 देवा, मला इतर लोकांशी याबद्दल बोलायची इच्छा होती.
परंतु त्यामुळे तुझ्या माणसांचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते हे मला माहीत होते.
16 या गोष्टी समजण्याचा मी खूप प्रयत्न केला
पण तुझ्या मंदिरात येण्यापूर्वी ते माझ्यासाठी फारच कठीण होते.
17 मी देवाच्या मंदिरात गेलो
आणि नंतर मला कळले.
18 देवा, तू त्या लोकांना खरोखरच एका धोकादायक परिस्थितीत टाकले आहेस.
खाली पडून सर्वनाश ओढवून घेणे त्यांना फारच सोपे झाले आहे.
19 अचानक संकटे येऊ शकतात
आणि नंतर त्या गार्विष्ठ माणसांचा नाश होतो.
भयंकर गोष्टी घडू शकतात
आणि मग त्यांचा सर्वनाश होतो.
20 परमेश्वरा, ते लोक म्हणजे झोपून
उठल्यावर विसर पडणाऱ्या स्वप्रसारखे आहेत.
आपल्या स्वप्रात येणाऱ्या राक्षसाप्रमाणे
तू त्या लोकांना अदृष्य करशील.
21-22 मी फार मूर्ख होतो.
मी श्रीमंत आणि दुष्ट माणसांचा विचार केला आणि मी गोंधळून गेलो.
देवा, मी गोंधळलो होतो आणि तुझ्यावर रागावलो होतो.
मी एखाद्या मूर्ख आणि अज्ञानी प्राण्यासारखा वागलो.
23 मला जे जे लागेल ते सर्व माझ्याजवळ आहे.
मी नेहमी तुझ्या जवळ असतो.
देवा, तू नेहमी माझा हात धरतोस.
24 देवा, तू मला मार्ग दाखव तू मला चांगला उपदेश कर
आणि नंतर तू मला गौरवाप्रत नेशील.
25 देवा, स्वर्गातही तू माझ्याजवळ असशील आणि जेव्हा तू जवळ असशील
तेव्हा या पृथ्वीवरचे मला आणखी काय हवे असणार?
26 कदचित् माझ्या शरीराचा आणि मनाचा नाश होईल
परंतु माझ्याजवळ मला आवडत असलेला खडक आहे.
देव सदैव माझ्याजवळ असतो.
27 देवा, जे लोक तुला सोडून जातात ते लोक हरवतील.
जे लोक तुझ्याशी प्रामाणिक नाहीत त्यांचा तू नाश करशील.
28 मी मात्र देवाकडे आलो आहे.
आणि ती माझ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे.
मी परमेश्वराला माझा प्रभु आणि माझी सुराक्षित जागा बनवले.
देवा, तू माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्यास त्याबद्दल सांगण्यासाठी मी आलो आहे.