27
राज्यातील अंमलदार 
 1 ही इस्राएल वंशजांच्या घराण्यातील प्रमुखांची यादी म्हणजे हजारांचे व शंभरांचे सरदार, त्याचप्रमाणे सैन्याचे अधिकारी, हे राजाची सेवा अनेक मार्गाने करत. प्रत्येक सैन्याचा गट हे वर्षाच्या सर्व महिन्यात सेवा करत असे. प्रत्येक गटात चोवीस हजार माणसे होती. 
 2 पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा पुत्र. याशबामच्या गटात चोवीस हजार जण होते.  3 तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्यांचा याशबाम प्रमुख होता. 
 4 अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा प्रमुख असून मिक्लोथ हा त्यांचा नायक होता. त्याच्या गटात चोवीस हजार माणसे होती.  5 तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेनापती बनाया. हा यहोयादाचा पुत्र. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली चोवीस हजार माणसे होती.  6 हाच तो बनाया जो तीसांतला शूर व तीसांवर प्रमुख होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात होता.  7 चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती यवाबाचा भाऊ असाएल. त्यानंतर त्याचा पुत्र जबद्या हा पुढे आपल्या सेनापती झाला. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.  8 शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.  9 इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हा इक्केशाचा पुत्र असून तकोई नगरातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते. 
 10 सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलस पलोनी हा होता. हा एफ्राइमाच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.  11 आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हूशाथी हा होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार जण होते.  12 नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबीयेजर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात चोवीस हजार सैनिक होते. 
 13 दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.  14 अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमाच्या वंशातला होता. त्याच्या गटात चोवीस हजार पुरुष होते.  15 बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते. 
 16 इस्राएलाच्या वंशाचे हे प्रमुख असे होते: रऊबेन जिख्रीचा पुत्र अलियेजर. 
शिमोन: माकाचा पुत्र शफट्या. 
 17 लेवी कमुवेलचा पुत्र हशब्या. अहरोन: सादोक. 
 18 यहूदा अलीहू. हा दावीदाचा एक भाऊ, इस्साखार: 
मीखाएलचा पुत्र अम्री. 
 19 जबुलून ओबद्याचा पुत्र इश्माया. नफताली: 
अज्रीएलाचा पुत्र यरीमोथ. 
 20 एफ्राईम वंशाचा अजऱ्याचा पुत्र होशेथ. 
पश्चिम मनश्शेः पदायाचा पुत्र योएल. 
 21 गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखऱ्याचा पुत्र इद्दो. 
बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेरचा पुत्र यासीएल. 
 22 दान वंशाचा यरोहामाचा पुत्र अजरेल. हे झाले इस्राएलांच्या वंशाचे प्रमुख. 
 23 दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलाची लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे परमेश्वराने सांगितले होते म्हणून इस्राएलांची लोकसंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे पुरुष यांची मोजणी केली नाही.  24 सरुवेचा पुत्र यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलाच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही मोजणी दावीद राजाच्या बखरीत नोंदवलेली नाही. 
 25 राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे:अदीएलाचा पुत्र अजमावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. उज्जीयाचा पुत्र योनाथान शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या आणि किल्ल्यातल्या भांडारांचा प्रमुख होता.  26 कलूबचा पुत्र एज्री हा शेतात काम करणाऱ्यांवरचा प्रमुख होता.  27 रामा येथील शिमी रामाथी हा द्राक्षीच्या मळ्यांवर होता. द्राक्षीच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षरसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता. 
 28 गदेरी हा बाल-हानान जैतूनाची झाडे आणि पश्चिमेकडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनाच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.  29 आणि शित्रय शारोनी हा शारोनात चरणाऱ्या गुरांचा मुख्य होता. अदलयचा पुत्र शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.  30 ओबील इश्माएली हा उंटांवरचा प्रमुख होता. येहद्या मेरोनोथ गाढवांवर मुख्य होता.  31 याजीज हगारी मेंढरांवर मुख्य होता. दावीद राजाच्या मालमत्तेचे हे सर्व अधिकारी होते. 
 32 दावीदाचा काका योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखक होता. हखमोनी याचा पुत्र यहीएल याच्यावर राज पुत्राच्या लालनपालनाची जबाबदारी होती.  33 अहिथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अर्की लोकांपैकी होता.  34 अहिथोफेलाची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा पुत्र. यवाब हा राजाचा सेनापती होता.