21
दुष्टांची भरभराट होते असे ईयोब निक्षून सांगतो 
 1 नंतर ईयोबाने उत्तर दिले. 
 2 “मी काय म्हणतो ते निट ऐक 
म्हणजे माझे सांत्वन होईल. 
 3 मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर, 
माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस. 
 4 माझी लोकांविरुध्द तक्रार काय आहे? 
मी अधीर का होऊ नये? 
 5 माझ्याकडे बघ व आश्चर्यचकित हो, 
व तुझे हात तू आपल्या तोंडावर ठेव. 
 6 माझ्यावर आलेल्या त्रांसाचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते 
आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो. 
 7 दुष्ट मनुष्यांना जास्त आयुष्य का असते? 
ते वृध्द आणि यशस्वी का होतात? 
 8 आणि त्याचे वंशज त्याच्या डोळ्यासमोर स्थापीत होतात, 
आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलेबाळे नांदतात. 
 9 त्यांची घरे भितीपासून सुरक्षित असतात, 
देवाची काठी त्याच्यांवर पडत नाही. 
 10 त्यांच्या बैलाचे प्रजोत्पादन असफल होत नाही. 
त्यांच्या गायींना वासरे होतात आणि त्यांची वासरे अकाली मृत्युमुखी पडत नाहीत. 
 11 ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. 
त्यांची मुले सभोवती नाचत असतात. 
 12 ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात 
आणि ते पावांचा नाद ऐकुण आनंदी होतात. 
 13 ते त्यांचे दिवस भरभराटीत घालवतात, 
नंतर ते शांतपणे * क्षणातखाली अधोलोकात जातात. 
 14 ते देवाला म्हणाले, आम्हास एकटे सोड 
आम्हास तुझ्या ज्ञानाच्या मार्गाची इच्छा नाही. 
 15 सर्वशक्तिमान कोण आहे, की त्याची उपासना आम्ही करावी? 
त्याची प्रार्थना करून आम्हास काय लाभ? 
 16 पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही? 
दुष्ट मनुष्याचा सल्ला माझ्यापासुन दूर असो. 
 17 वांरवार दुष्टाचा दिप विझवला जातो, 
त्याची विपत्ती त्यांच्यावर येते? 
आणि असे कीतीतरी वेळ घडते की, देव त्याच्या क्रोधाने त्यांची पीडा त्यांना वाटून देतो. 
 18 ते कितीदा वाऱ्यापुढे धसकटासारखे होतात, 
किंवा ते वादळाने उडालेल्या भूशासारखे होतात. 
 19 पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो. 
तर त्याने त्यालाच प्रतिफळ द्यावे म्हणजेच त्यास त्याचा दोष कळेल. 
 20 त्याच्या डोळ्यांनीच तो आपला नाश पाहो, 
तो सर्वशक्तिमान देवाच्या रागाचे प्राशन करो. 
 21 जेव्हा त्याच्या आयुष्याची मद्दत कमी करण्यास येईल, 
तेव्हा त्याच्या मरणानंतर तो त्याच्या परीवाराची काळजी कशी करील? 
 22 देवाला कोणी ज्ञान शिकवू शकते का? 
तो तर उच्च पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो. 
 23 एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो, 
पुर्णपणे शांतीत आणि सहजतेने. 
 24 त्याची भांडी दुधाने 
आणि त्याची हाडे मज्जारसाने ओलसर आहेत. 
 25 दुसरा मनुष्य मनाच्या कटूपणात मरतो, 
त्याने कधीच चांगले अनुभवलेले नसते. 
 26 शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. 
किडे त्यांना झाकून टाकतील. 
 27 पाहा, मला तुमचे विचार माहीती आहेत, 
कोणत्या चुकांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे. 
 28 तू कदाचित् म्हणशील ‘आता राजाचे घर कोठे आहे? 
दुष्ट ज्या तंबूत राहतो तो कोठे आहे. 
 29 तू कधीच प्रवास करणाऱ्या लोकांस विचारले नाहीस काय? 
ते काय चिन्ह देतील हे तुला ठावूक नाही काय, 
 30 दुष्ट मनुष्य नाशाच्या दिवसासाठी ठेवलेला आहे, 
आणि त्यास क्रोधाच्या दिवशी बाहेर आणतील. 
 31 त्याच्या तोंडावर त्याचा मार्ग कोण प्रकट करील? 
त्याने जे केले त्याची परत फेड कोण करील? 
 32 नंतर त्यास कबरेकडे नेतील, 
त्याच्या थडग्यावर पहारा ठेवतील. 
 33 खोऱ्यातील ढेकळे त्यास गोड लागतील, 
सर्व लोक त्याच्या पाठीमागे जातील 
जसे असंख्य लोक होऊन गेले तसे ते सर्व त्याच्या मागे जातील 
 34 मग तुमच्या मुर्खपणाने तुम्ही माझे सांत्वन कसे करु शकता, 
म्हणून तुमची उत्तरे काहीच नाही ती मुर्खपणाची आहेत.”