४
दबोरा आणि बाराक सीसराचा पराभव करतात  १ एहूद मृत्यू पावल्यावर इस्त्राएल लोकांनीं परमेश्वराच्या दृष्टीनें वाईट तें पुन्हा केलें.  २ तेव्हां परमेश्वरानें याबीन नांवाचा कनानाचा राजा जो हासोरांत राज्य करीत होता त्याच्या हातीं त्यांना दिलें; त्याचा सेनापति सीसरा हा हरोशेथ-गोयीम येथें राहत असे.  ३ त्याच्यापाशीं नऊशें लोखंडी रथ असून त्यानें वीस वर्षे इस्त्राएल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धांबा केला.  ४ त्या समयी लप्पिदोथाची बायको दबोरा संदेशहारिका ही इस्त्राएलाचा न्यायनिवाडा करित असे.  ५ एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशांतील रामा व बेथेल ह्यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरीखालीं तिची बैठक असे; इस्त्राएल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठीं येत असत.  ६ तिनें अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश-नफताली येथून बोलावून आणलें व त्याला विचारलें, तूं नफताली व जबुलून ह्यांच्यांतले दहा हजार पुरूष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्त्राएलाचा देव परमेश्वर ह्यानें तुला केली आहे ना?  ७ तो म्हणतो, याबीनाचा सेनापति सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असें मी करीन, आणि त्याला तुझ्या हातीं देईन.  ८ बाराक तिला म्हणाला, तूं माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाहींतर जाणार नाहीं.  ९ ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर अवश्य येईन,पण ह्या तुझ्या स्वारींत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सीसारा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथें गेली.  १० बाराकानें जबुलून व नफतालीं ह्यांना केदेश येथें बोलावले; मग त्याच्यामागोमाग दहा हजार पुरूष निघाले आणि दबोराहि त्याच्याबरोबर गेलीं.  ११ मोशेचा सासरा होबाब ह्याचे वंशज जे केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा विभक्त होऊन केदेशाजवळचें साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली डेरा देऊन राहिला होता.  १२ इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,  १३ तेव्हां सीसरा ह्यानें आपलें एकंदर नऊशें लोखंडी रथ आणि हरोशेथ-गोयीम येथून आपल्याजवळचे सर्व लोक कीशोन नदीवर जमा केले.  १४ दबोरा बाराकाला म्हणांली, ऊठ, आजच परमेश्वरानें सीसराला तुझ्या हाती दिले आहे; परमेश्वरतुझ्यापुढें निघाला आहे ना? मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून उतरले.  १५ परमेश्वरानें सीसरा, त्याचे सर्व सेना ह्यांचा बाराकासमोर तरवारीनें धुव्वा उडविला; तेव्हां सीसरा रथावरून उतरून पायींच पळून गेंला.  १६ इकडे बाराकांने हरोशेथ-गोयीमपर्यंत रथांचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तरवारीनें पडली; त्यांतला एकहि वांचला नाहिं.  १७ सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची बायको याएल हिच्या डे-याकडे पायीं पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचें घराणें ह्यांचें सख्य होतें.  १८ तेव्हां याएल सीसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, या स्वामी, या इकडे माझ्याकडे। भिऊं नका. तेव्हां तो तिच्याकडे डे-यांत गेला व तिनें त्याला कांबळीखालीं लपविलें.  १९ तो तिला म्हणाला, मला थोडें पाणी प्यावयाला दे बरें। मला तहान लागली आहे. तेव्हां तिने दुधाची बुधली उघडून त्याला दूध प्यावयाला दिलें व त्याला झांकलें.  २० तो तिला म्हणाला, डे-याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला कीं, येथें एखादा पुरूष आहे काय? तर नाहीं म्हणून सांग  २१ मग हेबेराची बायको याएल हिनें डे-याची मेख आणि हातोडा हाती घेऊन, आणि पाय न वाजवितां त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलांत ती मेख ठोकली; ता आरपार जाऊन जमिनींत रूतली. तो थकून गेल्यामुळें त्याला गाढ झोप लागली होती. अशा प्रकारें तो मेला.  २२ बाराक सीसराचा पाठलाग करीत आला तेव्हां त्याला याएल सामोरी येऊन म्हणाली, चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करीत आहां तो मी तुम्हांला दाखवतें. तो तिच्याबरोबर आतं जाऊन पाहतो तों सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलांत मेख ठोकलेली होती.  २३ अशा प्रकारें त्या दिवशी कनानाचा राजा याबीन ह्याचा देवानें इस्त्राएल लोकांपुढें धुव्वा उडविला.  २४ इस्त्राएल लोकांची सत्ता कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर अधिकाधिक वाढत गेली व शेवटीं त्यांनीं कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला.