23
मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, “मानवपुत्रा, शोमरोन व यरुशलेम ह्यांची गोष्ट ऐक, दोन बहिणी होत्या. त्यांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतला होता. त्या अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, मिसरमध्ये, वेश्या झाल्या. मिसरमध्ये, त्यांनी प्रथम प्रियाराधन केले आणि पुरुषांना स्तनाग्रांना स्पर्श करु दिला व आपली स्तने त्यांच्या हाती दिली. त्यातील थोरल्या बहिणीचे नाव अहला व धाकटीचे अहलीबा असे होते. त्या व वाहिणी माझ्या पत्नी झाल्या आम्हाला मुले झाली. (खरे म्हणजे अहला म्हणजेच शोमरोन व अहलीबा म्हणजे यरुशलेम होय.)
“मग अहलाने माझा विश्वासघात केला-ती वेश्येसारखी वागू लागली. तिला प्रियकर हवेसे वाटू लागले. तिने अश्शूरच्या सैनिकांना निळ्या गणवेषांत पाहिले. ते सर्व तरुण, हवेसे वाटणारे. घोडेस्वार होते. ते नेते व अधिकारी होते. अहलाने स्वतःत्या सर्वांच्याबरोबर व्यभिचार केला. ते सर्व अश्शूरच्या सैन्यातील निवडक सैनिक होते. तिला ते सर्व हवे होते. त्यांच्या अंमगळ मूर्तींबरोबर तीही अमंगळ झाली. ह्या व्यतिरिक्त, तिने आपले मिसरबरोबरचे प्रेम प्रकाश चालूच ठेवले. ती अगदी तरुण असतानाच मिसरने तिच्याबरोबर प्रियाराधन केले होते. तिच्या कोवळ्या स्तनांना स्पर्श करणारा पहिला प्रियकर मिसरच होय. मिसरने आपले खोटे प्रेम तिच्यावर ओतले. मी तिच्या प्रियकरांना तिच्या बरोबर व्यभिचार करु दिला. तिला अश्शुरी पाहिजे होते, म्हणून मी तिला त्यांच्या स्वाधीन केले. 10 त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी तिची मुले घेतली. आणि तलवारीने तिला ठार केले. त्यांनी तिला शिक्षा केली. तिचे नाव सर्व स्त्रियांच्या तोंडी अजूनही आहे.
11 “तिच्या धाकट्या बहिणीने अहलीबाने हे सर्व पाहिले, पण तिने आपल्या बहिणीपेक्षा जास्त पापे केली. ती अहलापेक्षा जास्त विश्वासघातकी होती. 12 तिलाही अश्शुरी नेते व अधिकारी हवे होते. निळ्या गणवेषातील ते घोडेस्वार तिला हवेसे वाटले. ते कामना करण्यास योग्य असेच तरुण होते. 13 सारख्याच चुका करुन, दोन्ही स्त्रिया, स्वतःच्या आयुष्याचा नाश करुन घेत आहेत, हे मला दिसले.
14 “अहलीबा माझा विश्वासघात करीतच राहिली. बाबेलमध्ये, भिंतीवर कोरलेली पुरुषांची चित्रे तिने पाहिली. ती लाल गणवेष घातलेल्या खास्दी पुरुषांची चित्रे होती. 15 त्यांनी कमरेला पट्टे बांधले होते आणि डोक्याला लांब फेटे बांधले होते. ते सर्व अतीरथीप्रमाणे दिसत होते. ते सर्व मूळच्या खास्द्यांप्रमाणे दिसत होते. 16 अहलीबा त्यांच्यावर आसक्त झाली. 17 म्हणून ते बाबेलचे पुरुष समागम करण्यासाठी तिच्या शृंगारलेल्या शय्येवर गेले. त्यांनी तिला भोगले आणि इतकी घाणेरडी, अमंगळ केले की तिला त्यांची घृणा वाटू लागली.
18 “अहलीबाने आपली बेईमानी सर्वांना पाहू दिली. तिने आपल्या नग्न शरीराशी अनेक पुरुषांना मौज करु दिली. त्यामुळे तिच्या बहिणीप्रमाणे मला तिचीही अतिशय घृणा वाटू लागली. 19 तिने पुन्हा पुन्हा माझा विश्वासघात केला. मग तिला मिसर बोररच्या तिच्या ऐन तारुण्यातील प्रेम प्रकरणाची आठवण झाली. 20 गाढवासारखे इंद्रिय व घोड्यासारखा वीर्यसाठा असलेल्या प्रियकराची तिला आठवण झाली.
21 “अहलीबा, तू तरुण होतीस तेव्हा तुझा प्रियकर तुझ्या स्तनाग्रांना स्पर्श करी व तुझे स्तन हातात धरी, त्याची तुला स्वप्ने पडू लागली. 22 म्हणून, अहलीबा, परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो ‘तुला तुझ्या प्रियकरांची किळस वाटते. पण मी त्यांना येथे आणीन. ते तुझ्याभोवती कोंडाळे करतील. 23 बाबेलच्या पुरुषांना विशेषतः खास्द्यांना मी येथे आणीन. पकोड, शोआ येथील पुरुषांनाही आणीन आणि अश्शुरींना ही आणीन. त्या सर्व हवेसे वाटणाऱ्या तरुण नेत्यांना, अधिकाऱ्यांना, अतीरथींना व निवडक घोडेस्वारांना मी येथे आणीन. 24 ह्या लोकांचा जथा तुझ्याकडे येईल. ते घोड्यांवर स्वार होऊन वा रथांतून तुझ्याकडे येतील. ते पुष्कळजण असतील. त्यांच्याजवळ भाले, ढाली, शिरस्त्राणे असतील, ते तुझ्याभोवती जमतील. तू माझ्याशी कसे वागलीस, हे मी त्यांना सांगीन. मग ते त्यांच्या परीने तुला शिक्षा करतील. 25 मी किती इर्ष्यावान आहे, ते मी तुला दाखवीन. ते सर्व खूप संतापून तुझा समाचार घेतील. ते तुझे नाक, कान कापतील. तलवारीने तुला ठार करतील. ते तुझी मुले घेतील आणि तुझे असेल नसेल ते सर्व ते जाळतील. 26 ते तुझी उंची वस्त्रे व दागिने घेतील. 27 मिसरबरोबरच्या प्रेम प्रकराणाच्या स्वप्नांचा मी चुराडा करीन. तू पुन्हा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाहीस. तू पुन्हा कधीही मिसरची आठवण काढणार नाहीस.’”
28 परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या. “तू ज्यांची घृणा करतेस, त्यांच्याच ताब्यात मी तुला देत आहे. तुला ज्यांची किळस वाटते, त्यांच्याच स्वाधीन मी तुला करीत आहे. 29 ते तुझा किती तिरस्कार करतात हे ते तुला दाखवून देतील. तू मिळविलेली प्रत्येक गोष्ट ते काढून घेतील. ते तुला उघडी नागडी करतील. लोकांना तुझी पापे स्पष्ट दिसतील. तू वेश्येप्रमाणे वागलीस आणि दुष्ट स्वप्ने पाहिलीस हे त्यांना कळेल. 30 दुसऱ्या राष्ट्रांच्या मागे लागून तू माझा त्याग केलास आणि ह्या वाईट गोष्टी केल्यास. त्या अमंगळ मूर्तींना पूजायाला तू सुरवात केलीस तेव्हाच ही दुष्कृत्ये तू केलीस. 31 तू तुझ्या बहिणीमागून गेलीस आणि तिच्याप्रमाणे वागलीस. तू तिचा विषाचा प्याला स्वतःच्या हातात घेतलास, तूच तुझ्या शिक्षेल कारणीभूत आहेस.” 32 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो.
 
“तुझ्या बहिणीचा विषाचा पेला तू पिशील.
तो पेला खूप मोठा आहे.
त्यात खूप विष (शिक्षा) मावते.
लोक तुला हसतील व तुझी चेष्टा करतील.
33 तू दारुड्याप्रमाणे झोकांड्या खाशील.
तू खूप दु:खी होशील.
तो विद्ध्वंस व नाश यांनी
भरलेला पेला आहे.
तुझ्या बहिणीने प्यायला,
तसाच हा पेला (शिक्षा) आहे.
34 तू त्या पेल्यातील विष पिशील.
तू शेवटचा थेंबसुद्धा पिशील.
तू पेला फेकून देशील
व त्याचे तुकडे तुकडे होतील.
तू वेदनेने स्वतःचेच स्तन उपटून काढशील.
असेच घडेल कारण मी परमेश्वर व प्रभू आहे
आणि मीच ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
 
35 “म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो ‘यरुशलेम, तू मला विसरलीस. तू मला दूर ढकललेस. मला मागे ठेवले तेव्हा माझा त्याग केल्याबद्दल आणि वेश्येप्रमाणे वागल्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. तुझ्या दुष्ट स्वप्नांमुळे आणि दुराचारामुळे तुला भोग भोगलेच पाहिजेत.’”
36 परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू अहला व अहलीबा यांचा न्यायनिवाडा करशील का? मग त्यांनी केलेल्या भयंकर गोष्टीबद्दल त्यांना सांग. 37 त्यांनी व्याभिचाराचे पाप केले आहे. खुनाचा अपराध त्यांनी केला आहे. त्या वेश्येप्रमाणे राहिल्या. त्या अमंगळ मूर्तीसाठी त्यांनी माझा त्याग केला. त्यांना माझ्यापासून झालेल्या मुलांना त्यांनी बळजबरीने आगीतून जायला लावले. त्यांच्या घाणेरड्या मूर्तींना अन्न देण्यासाठी त्यांनी हे सर्व केले. 38 त्यांनी माझे मंदिर अशुद्ध केले आणि माझ्या सुटृ्यांचे खास दिवस भ्रष्ट केले. 39 त्यांच्या मूर्तींना बळी देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना ठार मारले. ते माझ्या पवित्र स्थळी गेले आणि ते स्थळ त्यांनी अपवित्र केले. त्यांनी हे कृत्य माझ्या मंदिरात केले.
40 “निरोपे पाठवून त्यांनी दूरदूरच्या पुरुषांना बोलाविले, ते पुरुष त्यांना भेटायला आले. त्यांच्यासाठी तुम्ही स्नान केले, डोळ्यात काजळ घातले, अलंकार घातले. 41 तुम्ही सुंदर शय्येवर बसलात व पुढे टेबल ठेवून त्यावर माझा धूप व तेल ठेवलेत.
42 “पुष्कळ लोकांची मेजवानी सुरु असल्याप्रमाणे यरुशलेममधून आवाज आला. मेजवानीस खूप लोक जमले. वाळवंटाकडून येणारे आधीपासूनच मद्य प्राशन करीत होते. त्यांनी स्त्रियांना बांगड्या व मुकुट दिले. 43 तेव्हा व्यभिचाराच्या पापाने कंटाळलेल्या एका स्त्रीशी मी बोललो. मी तिला विचारले, ‘ते तुझ्याशी व तू त्यांच्याशी असेच व्यभिचाराचे पाप करीत राहणार का?’ 44 पण वेश्येकडे जावे, तसे ते तिच्याकडे जातच राहिले. खरेच! ते पुन्हा पुन्हा अहला व अहलीबा या दुष्ट स्त्रियांकडे जातच राहिले.
45 “पण सज्जन लोक त्यांना अपराधी ठरवितील. त्या स्त्रियांचा व्यभिचार व खून या अपराधांबद्दल ते त्यांचा न्यायनिवाडा करतील. का? कारण अहला व अहलीबा यांनी व्याभिचार तर केला आहेच, पण त्यांनी मारलेल्या लोकांचे रक्त अजून त्यांच्या हाताला लागले आहे.”
46 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “लोकांना एकत्र करा. मग त्या लोकानाच अहला व अहलीबा यांना शिक्षा करु द्या. लोकांचा जमाव त्यांना शिक्षा करील व त्या दोघींची चेष्टा करील. 47 मग जमाव त्यांना दगडाने ठेचून मारील. मग तलवारीने तो त्यांचे तुकडे तुकडे करील त्यांच्या मुलांनाही जमाव मारील व त्यांची घरे जाळील. 48 अशा रीतीने, ह्या देशावरचा कलंक मी घालवतो. तुमच्यासारख्या लज्जास्पद गोष्टी न करण्याचा इशारा इतर स्त्रियांना मिळेल. 49 तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल ते तुम्हाला शिक्षा करतील. तुमच्या अमंगळ मूर्तींची पूजा केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा होईल. मग तुम्हाला मीच परमेश्वर व प्रभू असल्याचे कळेल.”