5
1 मी माझ्या मित्रासाठी (देवासाठी) गाणे गाईन. हे गाणे, माझ्या मित्राच्या द्राक्षमळ्याच्या (इस्राएलच्या) प्रेमासंबंधी असेल.
माझ्या मित्राचा द्राक्षमळा अतिशय
सुपीक जमिनीत होता.
2 माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली.
तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली.
त्याने मळ्याच्या मध्यभागी
एक मनोरा बांधला.
द्राक्षाचे उत्तम पीक येईल अशी त्याला आशा होती
पण त्यातून निकृष्ट प्रतीचीच फळे आली.
3 म्हणून देव म्हणाला, “यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनो व यहूदात राहणाऱ्या लोकांनो,
माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा जरा विचार करा.
4 माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी आणखी काय करू शकलो असतो?
मला जे करणे शक्य होते ते सर्व मी केले
मी चांगल्या पिकाची आशा केली
पण पीक वाईट आले.
5 “आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे
ते तुम्हाला सांगतो.
मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढून
मी जाळून टाकीन.
त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून
दगड पायाने तुडवीन.
6 मी माझा द्राक्षमळा उजाड करीन.
कोणीही वेलीची काळजी घेणार नाही.
कोणीही त्या मळ्यात काम करणार नाही.
त्यात तण व काटेकुटे माजतील.
तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”
7 सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मालकीचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल हा देश होय. ज्या द्राक्षवेली परमेश्वराला प्रिय आहेत त्या म्हणजे यहुदी लोक होत.
परमेश्वराने न्यायाची आशा केली
पण तेथे फक्त हत्याच घडली.
परमेश्वराने प्रामाणिकपणाची आशा धरली
पण तेथे फक्त वाईट रितीने वागविलेल्या लोकांचे आक्रोश होते.
8 अजिबात जागा शिल्लक राहणार नाही अशारीतीने घराला घर व शेताला शेत जोडणाऱ्यांना तुमचा धिक्कार असो. परन्तु परमेश्वर तुम्हाला शिक्षा करील. असे हे तुम्हाला देशात एकाकी राहण्यास भाग पाडेपर्यंत चालू राहील.\f + \fr 5:8 \fk असे हे … चालू राहील ह्याचाअर्थ “बहुधा सर्व जमीन श्रीमंतांची होईल असा होतो. योबेल वर्षात (लेवी. 25:8-34) संपत्तीचा जो कायदा सांगितला आहे त्याच्या हे विरूध्द आहे.”\f*
9 सर्वशक्तिमान परमेश्वराने मला हे सांगितले व मी ऐकले, “आता तेथे खूप घरे आहेत पण मी नक्की सांगतो की ती सर्व उध्वस्त होतील. मोठी व सुंदर घरे तेथे आहेत पण ती सर्व रिकामी पडतील.
10 तेव्हा दहा एकराच्या द्राक्षाच्या मळ्यातून अगदी थोडा द्राक्षरस मिळेल आणि खूप पोती बियाणे वापरले तरी अगदी थोडे पीक येईल.”
11 लवकर उठून नशा आणणाऱ्या पेयाच्या शोधास लागणाऱ्यांनो तुमचा धिक्कार असो. तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता.
12 मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता आणि परमेश्वराची करणी तुम्हाला दिसत नाही. परमेश्वराने आपल्या हाताने अनेक गोष्टी घडवल्या आहेत पण त्या तुमच्या लक्षात येत नाहीत. हे तुमच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही.
13 परमेश्वर म्हणतो, “माझ्या लोकांना पकडून नेले जाईल. का? कारण ते समजदार नाहीत. त्यांच्यातील उच्चपदस्थांची उपासमार होईल. त्यांतील बहुसंख्य तहानेने तळमळतील.
14 पण ती सर्व मोठी माणसे मरतील व (शिओल) अधोलोकात अधिक भर पडेल. मृत्यु आपला अजस्त्र जबडा पसरेल आणि ते सर्व लोक खाली अधोलोकात जातील.”
15 लोक हीनदीन होतील. गर्विष्ठ माणसांच्या माना खाली जातील.
16 सर्वशक्तिमान परमेश्वर प्रामाणिकपणाने योग्य न्याय करील आणि लोकांना त्याची महानता कळेल. पवित्र देव योग्य त्याच गोष्टी करेल आणि लोक त्याचा आदर करतील.
17 देव इस्राएल लोकांना त्यांचा देश सोडून जाण्यास भाग पाडेल. सर्व भूमी ओसाड होईल. शेळ्या-मेंढ्यांना मोकळे कुरण मिळेल. एकेकाळी श्रीमंतांची मालकी असलेल्या जमिनीवर कोकरे चरतील.
18 त्या लोकांकडे पाहा लोक दोरांनी गाड्या खेचून नेतात तसे ते आपले गुन्हे व पापे वाहून नेत आहेत.
19 ते लोक म्हणतात, “देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे जे करायचे ते लवकरात लवकर करावे, म्हणजे आम्हाला काय घडणार आहे ते तरी कळेल. परमेश्वराची इच्छा लवकर पूर्ण व्हावी म्हणजे आम्हांला त्याची योजना कळेल.”
20 ते लोक चांगल्या गोष्टी वाईट आहेत व वाईट गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश समजतात. त्यांना आंबट गोड लागते व गोड आंबट लागते.
21 ते स्वतःला फार चलाख समजतात. त्यांना वाटते आपण फार बुध्दिमान आहोत.
22 मद्य पिण्यात त्यांची प्रसिध्दी आहे आणि मद्याचे मिश्रण करण्यात ते तरबेज आहेत.
23 जर त्यांना पैसे चारले तर गुन्हेगारालाही ते माफ करतील पण ते सज्जनांना प्रामणिकपणे न्याय मिळू देणार नाहीत.
24 अशा लोकांचे वाईट होईल. ज्याप्रमाणे आगीमध्ये पाने आणि गवत जळून भस्मसात होते त्याप्रमाणे त्यांच्या वंशजांचा पूर्णपणे नाश होईल. अंकुर मरून धुळीला मिळावा अथवा आगीत फूल जळून त्याची राख वाऱ्यावर कोठल्या कोठे उडून जावी तसाच त्यांच्या वंशजांचा समूळ नाश होईल.
त्या लोकांनी, सर्वशक्तिमान परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला. इस्राएलच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.
25 म्हणून परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. तो आपला हात त्यांच्यावर उगारेल आणि त्यांना शिक्षा करील. मग डोंगरसुध्दा भीतीने कापतील. मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडतील. पण तरीही देवाचा राग शांत होणार नाही. त्याचा हात लोकांना शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.
26 पाहा! दूरच्या राष्ट्रांना देव खूण करीत आहे, झेंडा उभारून तो त्या राष्ट्रांना आवाहन करीत आहे. दूरवरून शत्रू येत आहे.
लवकरच तो या देशात प्रवेश करील. तो फार वेगाने येत आहे.
27 शत्रू कधीच थकत नाहीत वा खाली पडत नाहीत. ते कधीच पेंगुळत नाहीत अथवा गाढ झोपून राहत नाहीत. ते नेहमीच शस्त्रसज्ज असतात. त्यांच्या पादत्राणांचे बंद कधीच तुटत नाहीत.
28 त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत. त्यांची धनुष्ये सज्ज आहेत. त्यांच्या घोड्यांचे खूर दगडासारखे कठीण आहेत. त्यांच्या रथांच्या मागे धुळीचे लोट उठतात.
29 ते गर्जना करतात आणि त्या गर्जना एखाद्या तरूण सिंहाच्या गर्जनेइतक्या मोठ्या असतात. जे लोक त्यांच्याशी लढतात त्यांना ते गुरगुरत पकडतात. लोक झगडतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना वाचविणारा तेथे कोणीही नसतो.
30 मग ते “सिंह” समुद्रगर्जना करतात. बंदिवासातील लोकांची नजर खाली वळते. त्यांच्या डोळ्यांपुढे अंधकार पसरतो. अंधकाराशिवाय तेथे काहीच असत नाही. सर्व प्रकाश या अंधकारातच लुप्त होतो.