5
1 आता मी तुमच्यातील वडीलजनांना आवाहन करतो (मी स्वतः एक वडील आहे आणि ख्रिस्ताच्या दु:खसहनाचा साक्षीदार आहे, तसेच भविष्यकाळात प्रकट होणाऱ्या गौरवाचा भागीदारसुद्धा आहे.)
2 तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा. व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालनपोषण करा. तुम्हांला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही, तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालनपोषण करा. तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करु नका तर तुम्ही सेवा करण्यास अधीर आहात म्हणून सेवा करा.
3 आणि ज्यांची काळजी घेण्याची कामगिरी तुमच्यावर सोपविली आहे, त्यांच्याशी एखाद्या हुकूमशहाप्रमाणे वागू नका, तर तुमच्या सर्व कळपापुढे एक उदाहरण होईल असे वागा.
4 आणि जेव्हा तुमचा मुख्य मेंढपाळ येईल, तेव्हा तुम्हाला कधीही नाश न पावणारा गौरवी मुगुट देईल.
5 त्याचप्रकारे तरुण बंधुनो, वडीलजनांच्या अधिन असा. आणि तुम्ही सर्वजण लिनतेचा पोशाख घालून एकमेकाशी विनयाने वागा कारण,
“देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो,
पण दीनांवर कृपा करतो.” \rq नीतिसूत्रे 3:34\rq*
6 देवाने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे यासाठी देवाच्या बलशाली हाताखाली लीनतेने राहा.
7 तुमच्या सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो,
8 सावध आणि जागरुक असा. तुमचा वैरी जो सैतान तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो.
9 त्याचा विरोध करा आणि तुमच्या विश्वासात खंबीर राहा. कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभर असलेल्या बंधूभगिनींना अशाच प्रकारचे दु:ख सहन करावे लागले, जसे तुम्ही सध्या अनुभवीत आहात.
10 परंतु काही काळ दु:ख सहन केल्यानंतर सर्व कृपेचा उगम जो देव, ज्याने येशू ख्रिस्ताच्या अनंतकाळच्या गौरवात भागीदार होण्यासाठी तुम्हाला पाचारण केले तो स्वतः तुम्हाला पुन्हा खंबीरपणे उभे करील. तुम्हाला सामर्थ्य देईल. तुम्हाला स्थिरता देईल.
11 त्याचे सामर्थ्य अनंतकाळचे आहे! आमेन.
12 तुम्हाला देवाच्या खऱ्या कृपेची साक्ष द्यावी व तुम्हाला उत्तेजन द्यावे म्हणून मी हे पत्र सिल्वानच्या हातून थोडक्यात लिहीत आहे कारण सिल्वान हा आपला विश्वासू भाऊ आहे. असे मी समजतो. देवाच्या खऱ्या कृपेत दृढ राहा.
13 तुमच्याबरोबरच देवाने निवडलेली बाबेल येथील मंडळी तुम्हांला सलाम सांगते, तसेच ख्रिस्तातील माझा पुत्र मार्क तुम्हांला सलाम सांगतो.
14 तुम्ही एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने सलाम करा.
तुम्ही जे सर्व ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हांबरोबर शांति असो.