4
1 तेव्हा मी पाहिले आणि स्वर्गात दार माझ्यासमोर उघडलेले दिसले. आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो आवाज म्हणाला, “इकडे ये, आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.”
2 त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्यासमोर सिंहासन होते. कोणी एक त्यावर बसलेले होते.
3 त्यावर जो बसला होता तो यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता आणि सिंहासनाभोवती पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते.
4 सिंहासनाभोवती चोवीस आसने होती, आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुगुट असलेले चोवीस वडील बसले होते.
5 सिंहासनापासून विजा व भिन्न आवाज निघत होते. शिवाय गडगडाट निघत होते. सिंहासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते.
6 तसेच सिंहासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते स्फटिकासारखे स्पष्ट होते.
मध्यभागी, सिंहासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते डोळ्यांनी भरले होते. पुढे डोळा, मागे डोळे.
7 पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा होता. दुसरा बैलासारखा होता. तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता. आणि चवथा उडत्या गरुडासारखा होता.
8 त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते. व त्यांना सगळीकडे डोळे होते. त्यांच्या पंखाखालीसुद्धा डोळे होते. दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते:
“पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभु देव सर्वसमर्थ
जो होता, जो आहे, आणि जो येणार आहे.”
9 जेव्हा जेव्हा ते जिवंत प्राणी सिंहासनावर बसलेल्याचा गौरव, सन्मान व उपकारस्तुति करीत होते आणि व जो सिंहासनावर बसलेला होता तो अनंतकाळपर्यंत जगत राहणारा आहे,
10 तेव्हा तेव्हा जो सिंहासनावर बसला होता आणि अनंतकाळपर्यंत राहतो त्याच्यासमोर चोवीस वडील पाया पडत होते आणि त्याची उपासना करीत होते. ते आपले मुगुट सिंहासनासमोर ठेवत होते. व म्हणत होते की:
11 “आमचा प्रभु आणि देव!
तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करुन घेण्यास योग्य आहेस.
तू सर्व काही तयार केलेस
तुला वाटत होते म्हणून सर्व काही अस्तित्वात आले आणि करण्यात आले.”