3
मग परमेश्वर योनाशी पून्हा बोलला. परमेश्वर म्हणाला, “त्या मोठ्या नगरीला, निनवेला जा आणि मी सांगतो तो संदेश सांग.”
मग योनाने परमेश्वराची आज्ञा पाळली. तो निनवेला गेला. निनवे फार मोठी नगरी होती. नगरीच्या एका टोकापासून दूसऱ्या टोकापर्यंत जाण्यास तीन दिवस चालावे लागे.
योना नगरी मध्यभागी जाऊन लोकांना उपदेश करु लागला. योना म्हणाला, “चाळीस दिवसानंतर निनवेचा नाश होईल.”
निनवेच्या लोकांनी परमेवराच्या संदेशावर विश्वास ठेवला. त्यांनी काही काळ उपवास करण्याचे ठरविले आणि आपल्या पापांचा विचार करण्याचा निश्चय केला. त्यांनी खेद प्रदर्शित करणारे खास कपडे घातले. नगरीतल्या सर्व लोकांनी असे केले. मग तो राव असो की रंक.
निनवेच्या राजाच्या कानावर या गोष्टी गेल्या. त्याला त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल खेद वाटला. त्याने त्याचे सिंहासन सोडले व आपली राजवस्त्रे उतरविली आणि दु:ख प्रकट करण्यासाठी असलेली वस्त्रे घातली. मग तो राखेत बसला. त्याने एक विशेष संदेश लिहिला आणि तो सर्व नगरीत घोषित केला.
 
राजा आणि महान राज्यकर्ते यांची आज्ञा:
काही काळ कोणत्याही माणसाने व पशूने काहीही खाऊ नये. गुराढोरांनी रानांत चरू नये. निनवेत राहणाऱ्या कोणत्याही सजीवाने खाऊ-पिऊ नये. प्रत्येक माणसाने व प्राण्याने दु:ख प्रकट करणारे वस्त्र पांघरले पाहिजे. माणसांनी परमेश्वरापाशी टाहो फोडला पाहिजे. प्रत्येकाचे जीवन बदलले पाहिजे आणि वाईट कर्मे करावयाचे थांबविले पाहिजे. मग कदाचित् देवाचे मनःपरिवर्तन होईल आणि योजलेल्या गोष्टी तो करणार नाही. कदाचित् देवाच्या मनात बदल होईल व तो रागावणार नाही, व आपला नाशही होणार नाही.
 
10 लोकांचे वागणे परमेश्वराने पाहिले. लोकांनी दुष्कृत्ये करावयाचे सोडून दिले हेही परमेश्वराने पाहिले. मग परमेश्वराचे मन बदलले व त्याने ठरविल्याप्रमाणे केले नाही. परमेश्वराने लोकांना शिक्षा केली नाही.