निर्गम
लेखक
मोशेला परंपरेने लेखक म्हणून नियुक्त केले आहे. या पुस्तकाच्या दैवी प्रेरित लेखकाच्या रुपात प्रश्नाशिवाय मोशेला स्वीकारण्याचे दोन समूळ कारणे आहेत. प्रथम, निर्गम हे पुस्तक स्वतः मोशेच्या लेखनाविषयी बोलते. निर्गम 34:27 मध्ये परमेश्वराने मोशेला “हे शब्द लिही” अशी आज्ञा दिली आहे. आणखी एक परिच्छेद आपल्याला सांगतो की “मोशेने देवाच्या सर्व वचनांना लिहून” देवाच्या आज्ञेचे पालन केले (24:4). हे असे गृहीत धरणे योग्य आहे की ही वचने मोशेच्या साहित्याविषयी वर्णन करतात जी निर्गमच्या पुस्तकात आढळतात. दुसरे, मोशेने निर्गममध्ये वर्णन केलेल्या घटना एकतर पाहिल्या होत्या किंवा तो त्यामध्ये सहभागी होता. त्याला फारोच्या घरात शिक्षण देण्यात आले होते आणि तो लिखाणात सर्व गुण-संपन्न होता.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 1446 - 1405.
इस्राएल लोकांनी त्यांच्या अविश्वासूपणामुळे त्या अरण्यात 40 वर्षापर्यंतचा काळ भटकण्यात घालवला. हे पुस्तक लिहिण्यासाठीची शक्यता या काळात अधिकाधिक आहे.
प्राप्तकर्ता
या पुस्तकाचे प्राप्तकर्ते स्वत: निर्गम उद्धाराची पिढी असतील. मोशेने मिसरामधून बाहेर पडलेल्या सीनाय समुदायासाठी निर्गम लिहिले. (निर्गम 17:14; 24:4; 34:27-28).
हेतू
निर्गमने वर्णन केले आहे की इस्राएल लोक कशा प्रकारे परमेश्वराचे लोक बनले आणि जे देवाचे लोक या नात्याने जगले होते त्या कराराच्या नियमांची मांडणी केली. निर्गम हे इस्राएलशी एक करार स्थापित करणाऱ्या विश्वासू, पराक्रमी, रक्षा करणारा पवित्र देव याचे चरित्र्य स्पष्ट करते. परमेश्वराचे चरित्र्य परमेश्वराच्या नावात आणि परमेश्वराच्या कृत्यांच्या माध्यमातून प्रकट झाले, हे दाखविण्यासाठी की अब्राहामासोबत परमेश्वराचे अभिवचन असे पूर्ण झाले जेव्हा परमेश्वराने अब्राहामाच्या वंशजांना मिसराच्या गुलामगिरीतून मुक्त केले (उत्पत्ती 15:12-16). ही तर एकच कौटुंबिक कथा आहे जी निवडलेले राष्ट्र बनवते (निर्गम 2:24; 6:5; 12:37). मिसरातून बाहेर पडलेल्या इब्री लोकांची संख्या दोन ते तीन दशलक्षांपर्यंत असावी.
विषय
सुटका
रूपरेषा
1. प्रस्तावना — 1:1-2:25
2. इस्त्राएलाचा उद्धार — 3:1-18:27
3. सिनाय पर्वतावर दिलेला करार — 19:1-24:18
4. देवाचा शाही तंबू — 25:1-31:18
5. बंड केल्याच्या कारणास्तव देवापासून दूर जाणे — 32:1-34:35
6. देवाच्या शाही तंबूची रचना — 35:1-40:38
1
मिसर देशात इस्त्राएल लोकांस सोसावा लागलेला छळ
1 याकोबाबरोबर जे इस्राएलाचे पुत्र व त्यांची कुटुंबे मिसर देशात गेली, त्यांची नावे हीः 2 रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा 3 इस्साखार, जबुलून, बन्यामीन; 4 दान, नफताली, गाद व आशेर. 5 याकोबाच्या वंशाचे एकूण सत्तरजण होते. योसेफ हा आधीच मिसर देशात होता. 6 नंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व मरण पावले. 7 इस्राएल लोक फार फलदायी होऊन त्यांची संख्या अतिशय वाढत गेली; ते महाशक्तीशाली झाले आणि सर्व देश त्यांनी भरून गेला. 8 नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करू लागला. त्यास योसेफाच्या स्मरणाची काही काळजी नव्हती. 9 तो आपल्या लोकांस म्हणाला, “इस्राएली वंशाच्या लोकांकडे पाहा, ते पुष्कळ अधिक आहेत व आपल्यापेक्षा शक्तीमानही झाले आहेत; 10 चला, आपण त्यांच्याशी चतुराईने वागू, नाहीतर त्यांची निरंतर अधिक वाढ होईल आणि जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे लोक आपल्या शत्रूला जाऊन मिळतील; आणि मग ते आपल्याविरुद्ध लढतील आणि देशातून निघून जातील.” 11 म्हणून त्याने त्यांना कामाच्या ओझ्याने जाचण्यासाठी त्यांच्यावर मुकादम नेमले. त्यांनी फारोकरता पिथोम व रामसेस ही दोन शहरे इस्राएल लोकांकडून बांधून घेतली; 12 पण मिसऱ्यांनी त्यांना जसजसे जाचले तसतसे ते संख्येने अधिकच वाढत गेले व अधिकच पसरले, म्हणून इस्राएल लोकांची त्यांना भीती वाटू लागली. 13 आणि मग मिसऱ्यांनी इस्राएल लोकांवर अधिक कष्टाची कामे लादली. 14 अशाप्रकारे त्यांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केले; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, बांधकामासाठी चुना बनविण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.
इस्त्राएली मुलांच्या हत्येचा कट
15 मग मिसराचा राजा इब्री सुइणींशी बोलला. त्यांच्यातल्या एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे पुवा असे होते. 16 तो म्हणाला, “तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करत असता, त्या प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पाहा, आणि त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्यास अवश्य मारून टाका.” 17 परंतु त्या इब्री सुइणी देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाची आज्ञा मानली नाही; तर त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले. 18 तेव्हा मिसराच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले?” 19 त्या सुइणी फारोला म्हणाल्या, “या इब्री स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात.” 20 त्याबद्दल देवाने त्या सुइणींचे कल्याण केले. इस्राएल लोक तर अधिक वाढून फार बलवान झाले. 21 त्या सुइणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणे वसवली. 22 तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा दिली, “जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्यास तुम्ही नाईल नदीमध्ये फेकून द्या, पण प्रत्येक मुलगी मात्र जिवंत ठेवा.”