15
अर्पणांविषयी नियम
1 मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 2 इस्राएल लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग. परमेश्वर तुम्हास एक देश वस्ती करण्यासाठी देत आहे. तुम्ही जेव्हा तिथे पोहचाल, 3 आणि तुम्ही परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे यांचे परमेश्वराकरता अर्पण कराल, मग ते होमार्पणाचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या सणातला तो यज्ञ असो.
4 जो कोणी आपले अर्पण परमेश्वराकरता आणतो त्याने हिनाच्या एक चतुर्थाश तेलात मळलेले एफाचा एक दशांश सपिठ अन्नार्पण आणावे. 5 प्रत्येक कोकऱ्याच्या होमार्पणाकरता किंवा यज्ञाकरता पेयार्पणासाठी एका हीनाचा एक चतुर्थाश द्राक्षरस तयार कर. 6 अन्नार्पण म्हणून प्रत्येक मेंढ्यामागे एकतृतीयांश हिन तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ तयार करावे. 7 परमेश्वरास सुवास यावा म्हणून एकतृतीयांश हिनभर द्राक्षरसाचे पेयार्पण तयार करावे.
8 जेव्हा तू परमेश्वराकरता होमार्पण किंवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोऱ्हा म्हणून अर्पण करावा. 9 तेव्हा अर्पण करणाऱ्याने त्या गोऱ्ह्या बरोबर अर्धां हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे. 10 तू पेयार्पणासाठी अर्धा हीन द्राक्षरस अग्नीतून केलेले अर्पण, परमेश्वरास सुवासाचे अर्पण कर.
11 तुम्ही परमेश्वरास जो बैल, मेंढा, मेंढी किंवा कोकरा यांचे अर्पण कराल ते याप्रमाणे करावे. 12 तुम्ही जे प्रत्येक अर्पण तयार कराल आणि ते अर्पण याप्रमाणे अर्पण करा. 13 अग्नीतून केलेले अर्पण परमेश्वरास सुवासाचे असे अर्पण करताना देशात जन्मलेल्या सर्वांनी या वस्तू याप्रमाणे अर्पण कराव्या.
14 तुमच्याबरोबर राहत असलेल्या परदेशीयाला अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेल्या कोणालाही परमेश्वराकरता हे सुवासिक हव्य अर्पण करायची इच्छा झाली तर तुमच्या प्रमाणेच त्यानेही केले पाहिजे. 15 हेच नियम सर्वांना लागू आहेत. इस्राएलचे लोक आणि परदेशी लोक तुमच्या देशात राहतात. त्यांना हे नियम सर्वकाळ लागू राहतील. तुम्ही आणि तुमच्याबरोबर राहणारे इतर लोक परमेश्वरापुढे समान आहात. 16 हे नियम व विधी तुम्हास आणि तुमच्यात राहणाऱ्या इतरांना एकच असावा.
17 परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला, 18 इस्राएल लोकांशी बोल व त्यांना सांग मी ज्या देशात तुम्हास घेऊन जात आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन पोहचाल. 19 जेव्हा तुम्ही तेथे पिकणारे अन्न खाल तेव्हा त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वरास अर्पण करा.
20 मळलेल्या कणिकेची पहिली पोळी करून परमेश्वरास अर्पण करावा. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी. 21 मळलेल्या कणिकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वरास पिढ्यानपिढ्या द्यावा. 22 जेव्हा तुम्ही परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या या सर्व आज्ञेपैकी कधीतरी नकळत मोडली. 23 परमेश्वराने त्या आज्ञा तुम्हास मोशे मार्फत दिल्या आहेत त्या दिवसापासून व पुढेही तुमच्या पिढ्यानपिढ्या आहेत. 24 तेव्हा असे व्हावे की, मंडळीला नकळत जर तुम्ही पाप केले, तर सर्व मंडळीने मिळून परमेश्वरास सुवास म्हणून एक गोऱ्हा होमार्पण, नियमानुसार अन्नार्पण आणि पेयार्पण करावे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण करावा.
25 म्हणून याजकाने इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याची क्षमा होईल. कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराकरता हव्य आणि आपला पापबलि परमेश्वरासमोर अर्पिला आहे. 26 इस्राएलाच्या सर्व लोकांस आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांस क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते.
27 पण जर फक्त एकाच मनुष्याने नकळत पाप केले तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल. 28 त्या मनुष्याने चुकून परमेश्वरापुढे पाप केले. तर त्या नकळत पाप करणाऱ्या मनुष्यासाठी प्रायश्चित करायला याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल. 29 जो मनुष्य चुकून पाप करतो त्याच्यासाठी हा नियम आहे. इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्यात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहेत.
30 पण जर एखादा व्यक्ती काही कृत्य करून उघड विरोध करतो, इस्राएलाच्या वंशात जन्मलेल्या मनुष्यासाठी किंवा परदेशी असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा. त्या मनुष्यास आपल्या लोकांतून काढून टाकावे. 31 कारण त्याने परमेश्वराचा शब्द तुच्छ मानला आहे आणि त्याने माझी आज्ञा मोडली. तर त्या व्यक्तीला पुर्णपणे तुमच्यातून काढून टाकले पाहिजे. त्याचा दोष त्याच्यावरच राहील.
शब्बाथ मोडणाऱ्यास दगडमार
निर्ग. 31:12-17
32 यावेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात राहत होते. एका मनुष्यास जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथाचा दिवस होता. इतरांनी त्यास ते करताना पाहिले. 33 ज्या लोकांनी त्यास लाकडे गोळा करताना पाहिले त्यांनी त्यास मोशे व अहरोनाकडे आणले आणि सर्व लोक भोवती गोळा झाले. 34 त्यांनी त्या मनुष्यास तिथेच ठेवले कारण त्यास काय शिक्षा द्यायची ते त्यांना माहीत नव्हते.
35 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तो मनुष्य मेला पाहिजे. तेव्हा सर्व लोकांनी त्याच्यावर छावणीबाहेर दगडमार करावी.” 36 म्हणून लोक त्यास छावणीबाहेर घेऊन गेले आणि त्यास दगडमार करून मारले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले.
वस्त्राच्या काठांना लावायचे गोंडे
37 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला 38 इस्राएली वंशजाशी बोल आणि त्यांना आज्ञा कर की, त्यांनी पिढयानपिढया आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर एक निळा दोरा बांधा. 39 या गोंड्याचा उद्देश असा की, ते बघून परमेश्वराने दिलेल्या सगळ्या आज्ञा लक्षात ठेवाल व आज्ञा पाळाल. तुमचे हृदय व तुमची दृष्टी ज्यांच्यामागे जाऊन तुम्ही व्यभिचारी होत असा, त्याच्यामागे तुम्ही जाऊ नये.
40 “माझ्या सगळ्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवावे. आपल्या देवाकरता पवित्र व्हावे. 41 मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हास मिसर देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मीच तुमचा देव परमेश्वर आहे.”