५
१ कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हास देवापासून मिळालेले सर्वकालचे घर स्वर्गात आहे. २ या तंबूत आम्ही कण्हत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचा पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. ३ आम्ही अशाप्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही.
४ कारण या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कण्हतो पण आमचे वस्त्र काढले जावे असे इच्छीत नाही, तर आमचा स्वर्गीय पोशाख घातला जावा म्हणजे हे मरणाधीनपण जीवनात गिळले जावे. ५ आणि याच एका गोष्टीसाठी ज्याने आम्हास तयार केले तो देव आहे आणि त्यानेच आम्हास पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
६ म्हणून आम्ही सतत धैर्य धरणारे आहोत कारण आम्ही हे जाणतो की आम्ही शरीरात रहात असताना प्रभूपासून दूर आहोत. ७ कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही; ८ आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत. ९ म्हणून आम्ही झटत आहोत, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे. १० कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्यास त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.
ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरून धरते
११ म्हणून आम्हास प्रभूचे भय कळले असल्यामुळे आम्ही मनुष्यांचे मन वळवतो पण आम्ही देवाला प्रकट झालो आहो; आणि मी अशी आशा धरतो की, आम्ही तुमच्या विवेकांत प्रकट झालो आहोत. १२ कारण तुमच्याजवळ आम्ही आमची पुन्हा प्रशंसा करीत नाही, पण तुम्हास आमच्या बाबतीत अभिमानाला कारण देतो; म्हणजे, मनुष्याच्या अंतःकरणाविषयी नाही, पण त्याच्या बाहेरच्या स्थितीविषयी जे अभिमान मिरवतात त्यांच्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तर असावे. १३ कारण आम्ही वेडे झालो असलो तर देवासाठी आणि आम्ही समंजस मनाचे असलो तर तुमच्यासाठी आहोत. १४ कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरते कारण आम्ही असे मानतो की एक सर्वांसाठी मरण पावला तर सर्व मरण पावले, १५ आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मरण पावला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
ख्रिस्ताच्या ठायी राहिल्याने नवजीवन
१६ म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही. १७ म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे; १८ हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली; १९ म्हणजे लोकांचे अपराध त्यांच्या हिशोबी न धरता, देव जगाचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करीत होता आणि समेटाचे वचन त्याने आमच्यावर सोपवले.
समेटाचा संदेश
२० तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हास आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा. २१ कारण जो पाप जाणत नव्हता त्यास त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.