७
१ मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. २ तो म्हणाला, “मानवपुत्रा, हा आहे परमेश्वराचा, तुझ्या प्रभूचा, इस्राएलच्या भूमीसाठी संदेश.शेवट येत आहे. संपूर्ण देशाचा नाश होईल. ३ आता तुमचा अंतकाळ येत आहे. मी तुमच्यावर किती रागावलो आहे ते दाखवीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या भयंकर कृत्यांची किंमत मी तुम्हाला मोजायला लावीन. ४ मी तुम्हाला अजिबात दया दाखविणार नाही. मला तुमच्याबद्दल वाईट वाटणार नाही. तुमच्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला सजा देत आहे. तुम्ही फारच भयंकर कर्मे केलीत. आता तुम्हाला कळेल की मीच देव आहे.” ५ नंतर परमेश्वराने, माझ्या प्रभुने पुढील गोष्टी सांगितल्या. “एकापाठोपाठ एक अरिष्ट येईल. ६ शेवट येत आहे. तो लवकरच येईल. ७ इस्राएलवासीयांनो, तुम्ही शिटीचा आवाज ऐकत आहात ना? शत्रू येत आहे. शिक्षेची ती वेळ लवकरच येत आहे. पवर्तांवरुन शत्रूचा आवाज अधिकाधिक वाढत चालला आहे. ८ आता लवकरच, तुम्हाला, मी किती रागावलो आहे, ते कळेल. मी माझा सगळा राग तुमच्यावर काढीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या भयंकर कर्मांची किंमत मी तुम्हाला मोजायला लावीन. ९ मी तुम्हाला अजिबात दया दाखविणार नाही. मला तुमच्याबद्दल वाईट वाटणार नाही. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करत आहे. तुम्ही फारच भयानक कृत्ये केली. आता तुम्हाला कळेल की तुम्हाला दणका देणारा मी तुमचा परमेश्वर आहे. १० “रोप उगवते व वाढते आणि त्याला फुले येतात, त्याप्रमाणे शिक्षेची ती वेळ आली आहे. देवाने खूण केली आहे. शत्रू तयार झाला आहे. शिक्षेला सुरवात होत आहे. हातातील काठीला अंकुर फुटले आहेत.गर्विष्ठ राजा (नबुखद्नेस्सर) अधिक तयार झाला आहे. ११ तो हिंसक माणूस त्या दुष्टांना शिक्षा करायला सज्ज झाला आहे. इस्राएलमध्ये खूप लोक आहेत पण तो त्यांच्यातला नाही. तो त्या गर्दीतला एक नाही. तो कोणी त्या लोकांचा मोठा नेता नाही. १२ “ती शिक्षेची वेळ आली आहे. तो दिवस जवळच आहे. विकत घेणाऱ्यांना आनंद होणार नाही, विकणाऱ्यांना खेद वाटणार नाही. का? कारण प्रत्येकालाच ती भयंकर शिक्षा भोगावी लागले. १३ स्वत:ची मालमत्त विकणाऱ्या लोकांना ती कधीच परत मिळणार ना.एखादा जरी जिवंत राहिला, तरी त्याला ती मिळणार नाही. का? कारण हा दृष्टान्त सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे एखादा जिवंत राहिल्यास, बाकीच्यांना काही आनंद होणार नाही. १४ “ते तुतारी फुंकून लोकांना सावध करतील. लोक लढायला सज्ज होतील पण ते लढण्यास पुढे सरसावणार नाहीत. का? कारण मी सगळ्यांना माझ्या कोपाची तीव्रता दाखवून देईन. १५ शत्रू नगरीबाहेर तलवार घेऊन सज्ज आहे. रोगराई व उपासमार नगरीत आहेत. एखादा बाहेर गेला, तर शत्रू सैनिक त्याला ठार करील आणि ते नगरीत राहिले तर, उपासमार व रोगराई त्यांचा नाश करील. १६ “पण काही लोक निसटतील ते पवर्ताकडे धाव घेतील. पण त्यांना सुख लागणार नाही. पण स्वत:च्याच पापांमुळे ते दु:खी होतील. ते रडतील आणि दु:खाने पारव्याप्रमाणे घुमतील. १७ लोक इतके दमलेले व दु:खी कष्टी असतील की ते हात उचलू शकणार नाहीत, त्यांचे पाय पाण्याप्रमाणे होतील. १८ ते शोकप्रदर्शक कपडे घालतील आणि अतिशय भयभीत होतील. प्रत्येक चेहरा लज्जित झालेला तुम्हाला दिसेल. दु:ख प्रकट करण्यासाठी ते आपली डोकी भादरतील. १९ ते त्यांच्याजवळील चांदीच्या मूर्ती रस्त्यावर टाकतील. सोन्याच्या मूर्ती त्यांना घाणेरड्या चिंध्यांप्रमाणे वाटतील. का? कारण परमेश्वराच्या क्रोधाग्नीतून त्या मूर्ती त्यांना वाचवू शकणार नाहीत. त्या मूर्ती म्हणजे फक्त लोकांचे पतन व्हावे (पाप करावे) म्हणून रचलेले सापळे होते. त्या लोकांना त्यांच्या मूर्ती अन्न देणार नाहीत व स्वत:चेही पोट भरणार नाहीत. २० “त्या लोकांनी आपल्या सुंदर दागिन्यांचा उपयोग करुन मूर्ती घडविली. त्यांना त्याचा अभिमान वाटत होता. त्यांनी भयानक मूर्ती बनविल्या. त्यांनी अशा घाणेरड्या वस्तू तयार केल्या. म्हणून मी (देव) त्यांना घाणेरड्या लक्तराप्रमाणे दूर फेकून देईन. २१ त्यांना मी परकीयांच्या हाती सोपवीन. ते परके त्यांची टर उडवितील. ते काहींना ठार करतील तर काहींना कैद करतील. २२ मी तोंड फिरवीन, त्यांच्याकडे पाहणारसुद्धा नाही. ते परके लोक माझ्या मंदिराचा विध्वंस करतील. त्या पवित्र मंदिराच्या गाभाऱ्यात ते शिरतील आणि मंदिर अपवित्र करतील. २३ “कैद्यांसाठी बेड्या तयार करा. का? कारण पुष्कळ लोकांना, दुसऱ्यांना ठार मारल्याबद्दल, शिक्षा केली जाईल. नगरीच्या प्रत्येक जागी हिंसा होईल. २४ मी दुसऱ्या राष्ट्रांतून दुष्ट लोक आणीन. ते इस्राएलच्या लोकांची सर्व घरे बळकावतील. तुमचे गर्वाचे घर मी खाली करीन. तुमची पूजास्थाने दुसऱ्या राष्ट्रांतील लोक ताब्यात घेतील. २५ “तुम्ही भीतीने कापाल. तुम्ही शांतीचा शोध घ्याल पण ती कोठेच मिळणार नाही. २६ एकामागून एक वाईट गोष्टी तुम्ही ऐकाल. तुमच्या कानावर फक्त वाईट बातम्याच पडतील. तुम्ही संदेष्ट्याला शोधून दृष्टान्ताबद्दल विचारायला पाहाल, पण तुम्हाला असा कोणीच भेटणार नाही. याजकाजवळ तुम्हाला शिकविण्यासारखे काहीच नसेल. वडीलधारी मंडळी (नेते) तुम्हाला योग्य सल्ला देणार नाहीत. २७ तुमचा राजा मृतांसाठी रडत असेल. नेते शोकप्रदर्शक कपडे घालतील. सामान्य लोकांची घाबरगुंडी उडेल. का? कारण त्यांच्या कर्मांचे फळ मी त्यांना देईने. मी त्यांची शिक्षा ठरवीन, आणि ती अंमलात आणीन. मगच त्या लोकांना मीच परमेश्वर असल्याचे कळून येईल.”