२२
१ मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले, तो म्हणाला, २ “मानवपुत्रा, तू न्याय करशील का? खुन्यांच्या नगरीचा यरुशलेमचा तू न्यायनिवाडा करशील का? तिने केलेल्या भयंकर गोष्टीबद्दल तू तिला सांगशील का? ३ ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, असे तू तिला सांगितलेच पाहिजेस. नगरी खुन्यानी भरली आहे. म्हणूनच तिच्या शिक्षेची वेळ. लवकरच येईल. तिने स्वत:साठी अंमगळ मूर्ती तयार केल्या, आणि त्या मूर्तींनी तिला गलिच्छ केले. ४ “यरुशलेमवासीयांनो, तुम्ही पुष्कळ लोकांना ठार केले. तुम्ही अमंगळ मूर्ती तयार केल्या. तुम्ही अपराधी आहात आणि तुम्हाला शिक्षा होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तुमचा शेवट आला आहे. इतर राष्ट्रे तुमची टर उडवितील. ती तुम्हाला हसतील. ५ जवळचे व दूरचे तुमची चेष्टा करतील. तुम्ही तुमच्या नावाला काळिमा फासलात. तुम्हाला हास्याचा गडगडाट ऐकू येऊ शकतो. ६ “पाहा! यरुशलेममध्ये, प्रत्येक राज्यकर्ता दुसऱ्याला ठार करण्याइतका सामर्थ्यशाली झाला. ७ यरुशलेमचे लोक आई - वडिलांचा मान ठेवीत नाहीत. राहणाऱ्या परदेशींयांना ते त्रास देतात. ते विधवांना व अनाथांना फसवितात. ८ तुम्ही लोक माझ्या पवित्र वस्तूंचा तिरस्कार करता. माझ्या विश्रांतीच्या खास दिवसांना महत्व देत नाही. ९ यरुशलेमचे लोक दुसऱ्यांबद्दल खोटेनाटे सांगतात. निष्पाप लोकांना ठार माण्यासाठी ते असे करतात. लोक, डोंगरावर, खोट्या देवांची पूजा करण्यासाठी जातात व सहभोजन करण्यासाठी यरुशलेमला येतात. “यरुशलेममध्ये, लोक पुष्कळ लैंगिक पापे करतात. १० ह्या नगरीत, ते वडिलांच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतात. रजस्वला स्त्रीवरही ते बलात्कार करतात. ११ कोणी आपल्या शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करतो, कोणी स्वत:च्या सुनेबरोबर संबंध ठेऊन तिला अपवित्र करतो, तर कोणी त्यांच्या वडिलांच्या मुलीशी म्हणजेच स्वत:च्या बहिणीवरच बलात्कार करतो. १२ “यरुशलेममध्ये, तुम्ही, लोकांना मारण्यासाठी पैसे घेता, उसने पैसे दिल्यास त्यावर व्याज आकारता, थोड्याशा पैशाकरीता शेजाऱ्यांना फसविता. तुम्ही लोक मला विसरले आहात. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. १३ “देव म्हणाला, ‘इकडे पाहा! मी जोराने हात आपटून तुम्हाला थांबवीन. लोकांना फसविल्याबद्दल व ठार मारल्याबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. 14त्यो वेळी तुम्हाला धैर्य राहील का?मी शिक्षा करायला येईन तेव्हा तुम्हाला शक्ती राहील का? नाही! मी परमेश्वर आहे. मी हे बोललो आहे आणि मी बोलल्याप्रमाणे करीन. १४ त्यो वेळी तुम्हाला धैर्य राहील का?मी शिक्षा करायला येईन तेव्हा तुम्हाला शक्ती राहील का? नाही! मी परमेश्वर आहे. मी हे बोललो आहे आणि मी बोलल्याप्रमाणे करीन. १५ मी तुम्हाला राष्ट्रां-राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन. मी तुम्हाला वेगवेगळ्या देशांत सक्तीने पाठवीन. ह्या नगरीतील अमंगळ गोष्टींचा मी संपूर्ण नाश करीन. १६ पण, यरुशलेम, तू अपवित्र होशील. इतर राष्ट्रे ह्या घटता पाहतील. मग तुम्हाला कळून चुकेल की मीच परमेश्वर आहे.” १७ परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला, १८ “मानवपुत्रा, चांदीच्या तुलनेत कास्य, लोखंड, शिसे व कथील कवडीमोलाचे आहेत. कामगार चांदी शुद्ध करण्यासाठी ती विस्तवात टाकतात. चांदी उष्णतेने वितळते आणि मग कामगार चांदीपासून टाकाऊ भाग वेगळा काढतात. इस्राएल हे राष्ट्र त्या टाकाऊ भागासारखे झाले आहे. १९ म्हणून परमेश्वर, प्रभू, पुढील गोष्टी सांगतो. ‘तुम्ही सर्व लोक टाकाऊ भागासारखे झाला आहात. म्हणून मी तुम्हाला यरुशलेममध्ये गोळा करीन. २० कामगार चांदी, कास्य, लोखंड, शिसे व कथील आगीत टाकतात. फुंकून विस्तव फुलवितात. मग घातू वितळू लागतो. त्याचप्रमाणे, मी तुम्हाला माझ्या आगीत टाकून वितळवीन. माझा भयंकर क्रोध हीच ती आग होय. २१ मी माझ्या रागाच्या अग्नीत तुम्हाला टाकीन. तो फुंकून प्रज्वलित करीन. मग तुम्ही वितळू लागाल. २२ चांदी आगीत वितळते. मग कामगार ती ओतून घेऊन बाजूला काढतात. त्याच पद्धतीने, तुम्ही नगरीत वितळाल. मगच तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे आणि माझ्या रागाचा मी तुमच्यावर वर्षाव केला आहे.” २३ मला परमेश्वराकडून संदेश मिळाला तो म्हणाला, २४ “मानवपुत्रा, इस्राएलशी बोल ‘ती शुद्ध नाही’असे तिला सांग. मी त्या देशावर रागावलो असल्याने, तेथे पाऊस पडणार नाही. २५ यरुशलेममधील संदेष्टे कट करीत आहेत. ते संदेष्टे सिंहासारखे आहेत. शिकारीचा समाचार घेताना तो गर्जना करतो. त्या संदेष्टांनी खूप आयुष्यांचा नाश केला, त्यांनी पुष्कळ किंमती वस्तू बळकावल्या आहेत, यरुशलेममधील अनेक स्त्रियांच्या वैधव्याला ते कारणीभूत झाले. २६ “याजकांनी माझ्या शिकवणुकीचा नाश केला. माझ्या पवित्र वस्तू त्यांनी अपवित्र केल्या. त्यांना महत्व देत नाहीत. ते माझ्या पवित्र गोष्टी व इतर अपवित्र गोष्टी ह्यात फरक करीत नाहीत. शुद्ध व अशुद्ध गोष्टी सारख्याच मानतात. ते लोकांनाही ह्याबद्दल शिकवण देत नाहीत. माझ्या सुटृ्यांच्या खास दिवसांचा मान राखत नाहीत. त्यांनी माझे पावित्र नष्ट केले. २७ “यरुशलेमचे नेते, आपल्या शिकारीवर तुटून पडणाऱ्या लांडग्यासारखे आहेत. ते संपत्तीसाठी लोकांवर हल्ला करुन त्यांना ठार मारतात. २८ “संदेष्टे लोकांना ताकीद देत नाहीत. ते सत्य झाकून ठेवतात. हे संदेष्टे, तटबंदीची दुरुस्ती न करता, वरवर गिलावा देऊन भगदाडे बुजविणाऱ्या, कामगारांप्रमाणे आहेत. त्यांना फक्त खोटेच दिसते. ते मंत्र-तंत्राच्या आधारे भविष्य जाणून घेतात, पण लोकांशी फक्त खोटेच बोलतात. ते म्हणतात ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो.’ पण हे सर्व खोटे आहे. परमेश्वर त्यांच्याशी बोललेला नाही. २९ “सामान्य लोक एकमेकांचा फायदा घेतात. ते एकमेकांना फसवितात आणि लुबाडतात. ते गरीब, असहाय लोकांना अगदी क्षुद्र लेखतात. ते परदेशींयांना फसवितात व ह्याबद्दल देशात कायदा अस्तित्वात नसल्याप्रमाणेच वागतात. ३० “मी, लोकांना, त्यांच जीवनमार्ग बदलून, देशाचे रक्षण करण्यास सांगितले. मी तटबंदीची दुरुस्ती करण्यास सांगितले. लोकांना तटबंदीला पडलेल्या भगदाडाजवळ उभे राहून देशाच्या रक्षणाकरिता लढावे, अशी माझी इच्छा होती. पण कोणीही मदतीला आले नाही. ३१ म्हणून मी माझा जळता राग त्यांच्यावर ओतीन. मी त्यांचा संपूर्ण नाश करीन. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना शिक्षा करीन. चूक सर्वस्वी त्यांची आहे.” परमेश्वर, माझा देव, असे म्हणाला.