२
पौलाची कामगिरी यरुशलेमकरांना मान्य होते
१ नंतर, चौदा वर्षांनी मी पुन्हा, बर्णबाबरोबर, यरुशलेम शहरास वर गेलो, मी आपल्याबरोबर तीतालाही नेले. २ मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयात गाजवत असतो, ती मी त्यांच्यापुढे मांडले; पण जे विशेष मानलेले होते त्यांना एकांती मांडले; नाही तर, मी व्यर्थ धावतो किंवा धावलो, असे कदाचित् झाले असते. ३ पण माझ्याबरोबर असलेला तीत हा ग्रीक असल्यामुळे, त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. ४ आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते. ५ शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे रहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही. ६ तरीही, जे विशेष मानलेले कोणी होते त्यांच्याकडून (ते कसेहि असोत होते त्याचे मला काही नाही; देव मनुष्याचे बाह्य रूप पाहत नाही.) कारण जे विशेष मानलेले होते त्यांनी मला काही अधिक दिले नाही. ७ तर उलट सुंता झालेल्या यहूद्यांना शुभवर्तमान सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते तसेच सुंता न झालेल्या परराष्ट्रीय लोकांस शुभवर्तमान सांगणे माझ्यावर सोपवले आहे, हे त्यांनी बघितले. ८ कारण ज्याने पेत्राच्याद्वारे सुंता झालेल्या लोकात प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली. ९ आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे. १० मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती; आणि मी तर त्याच गोष्टी करण्यास उत्कंठीत होतो.
केफाचा (पेत्राचा) निषेध
११ आणि त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्यासमोर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता. १२ कारण याकोबापासून कित्येकजण येण्याअगोदर तो अन्यजाती लोकांबरोबर जेवत असे; पण ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांस भिऊन त्याने माघार घेऊन वेगळा राहू लागला. १३ तेव्हा तसेच दुसर्या यहूदी विश्वास ठेवणाऱ्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले; त्यामुळे बर्णबादेखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला. १४ पण मी जेव्हा हे बघितले की, शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमोर मी केफाला म्हटले, “तू स्वतः यहूदी असून तू जर परराष्ट्रीयाप्रमाणे राहतोस आणि यहूद्यांप्रमाणे वागत नाहीस, तर जे परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्याच्यावर जुलूम करितोस हे कसे?”
नियमशास्त्राची अपूर्णता
१५ आम्ही जन्मापासूनच यहूदी आहोत, पापी परराष्ट्रीयातले नाही. १६ तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे ठरतो, हे ओळखून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. १७ पण ख्रिस्तात नीतिमान ठरवले जाण्यास पाहत असता जर आपणदेखील पापी आढळलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. १८ कारण मी जे पाडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला नियमशास्त्र मोडणारा ठरवीन. १९ कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे, ह्यासाठी की, मी देवाकरता जगावे. २० मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. २१ मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राकडून असेल तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.